ठाणे जिल्हा परिषद

           

विभाग : ग्रामपंचायत विभाग

प्रस्तावना

मानवाच्या मुलभुत गरजा अन्न, वस्त्र, निवारा असून त्यापैकी निवारा ही मानवाची अत्यंत आवश्यक गरज आहे. सामान्य नागरिकांचे स्वत:चे घर असल्यास त्यांना सामाजिक सुरक्षितता लाभून समाजामध्ये दर्जा प्राप्त होतो ज्या व्यक्तींना घर नाही अशा व्यक्तींना निवारा मिळण्यासाठी केंद्र शासनाने सन 1985-86 पासुन घरकुल योजना सुरु केली असुन एप्रिल 1989 पासुन ही योजना जवाहर रोजगार योजनेची उपयोजना म्हणून सुरु झाली. 1 जानेवारी, 1996 पासुन ती एक स्वतंत्र इंदिरा आवास योजना म्हणुन सुरु करण्यात आलेली आहे. इंदिरा आवास योजनेचे नामकरण सन 2016-17 या आर्थिक वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण असे झालेले आहे.

जिल्हाच्या ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 2016-17 ते 2020-21 अंतर्गत 6684 घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी 6429 घरकुले पूर्ण करण्यात आलेली आहेत. त्यानुसार 96% घरकुले पूर्ण झालेली असून शिल्लक 255 प्रलंबित घरकुले तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सन 2021-22 करीता ठाणे‍ जिल्ह्यास 2818 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त असून 2210 घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत. उर्वरित 608 घरकुले तातडीने मंजूर करण्याबाबत तालुकास्तरावर कार्यवाही सुरु आहे.

राज्य पुरस्कृत आदिम आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना अंतर्गत 2016-17 ते 2021-22 करीता 4718 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त असून 4276 घरकुलांना मंजूरी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे 3416 घरकुले पूर्ण करण्यात आलेली आहेत. उर्वरित 442 घरकुलांना तातडीने मंजूरी करण्याबाबतची कार्यवाही तालुकास्तरावर सुरु आहे. तसेच 860 घरकुले पूर्ण करण्याबाबत तालुकास्तरावर लाभार्थी, ग्रामसेवक व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचे संयुक्त मेळावे लावून सदर घरकुले वेळेत पूर्ण करण्याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांचेकडून नियोजन करण्यात आलेले आहे.